Tuesday, 31 January 2017

रक्तपिपासू: डास आणि बायको

मोहन कोठेकर
लेखक आणि ब्लोगर

     डासांचा प्रादुर्भाव अनंत काळापासून मानवासह सर्व प्राणीमात्रांना होतो.  मोठी शहरे असोत की किर्र जंगल डास सर्वव्यापी असल्यामुळे डासांचे थवेच्या थवे नागरिकांना हैराण करतात.  आरोग्य विभाग कोणतीही उपाययोजना करीत नाही ही कुरकुर जनता सतत करते.  आरोग्य विभागात काम करणारे कर्मचारी शेवटी माणूस आहेत, त्यांनाही इतरांप्रमाणे डास चावत असतील.  डास हे सरकारी कर्मचारी नाही आणि ते चिरमिरी घेत नाही हे चातुर्व्यम सत्य आहे, एकाला चावायचे तर दुसऱ्याला नाही असे नसते.  तेंव्हा नागरिकांनी आरोग्य विभागावर विश्वास ठेवावयास हवा.  नागरिकांची एक तक्रार असू शकते की आरोग्य विभाग डास निर्मूलनाची कार्यवाही स्वतःच्या घरापुरती मर्यादित असावी.  पण तसे ही संभव नाही.  लगेच शेजारच्या घरातील मच्छर रिकामी जागा व्यापतील.

 

डास भक्ष्य शोधण्यासाठी सर्वसाधारणपणे एक ते तीन मैलाचा प्रवास करतो. प्रवासाचा वेग तासी एक ते दीड मैल असतो. कांही डासांच्या प्रजाती भक्ष्य शोधण्यासाठी २० ते ४० मैलांचा प्रवास सहज करतात.  शंभर मैलांचा प्रवास करणारे कांही महाभाग प्रजाती आहेत.  बहुमजली इमारतीतील सर्वात वरच्या मजल्यावर राहणाऱ्याना इतरांसारखाच त्रास होतो.  एकावेळेस डास २५ ते ४५ फुट उंच उडतो, आराम घेतो, पुन्हा उंच उडतो.  सौभाग्य कांक्षिणी आपले  सावज गटविण्यासाठी सातासमुद्रापलीकडे मजल दरमजल करते आणि कोणत्याही मजल्यावर पतीला त्रास देण्यास सज्ज असते, तिचे सर्व आयुष्य डास या जाती सारखे असते.  तेंव्हा सर्वांना सारखा त्रास होतो.  कोणतेही सरकार डास आणि सौ. यांचे निर्मुलन करू शकत नाही हे कृपया लक्ष्यात ठेवा.  डासांचा संपूर्ण नायनाट करणाऱ्या संशोधकाला सरकार स्वतः कोणत्याही शिफारशी शिवाय भारत रत्न पुरस्कार देईल.     
 
     डास मारण्याच्या भानगडीत पडू नका.  डासांची पैदास शेकड्याने होते.  एका वेळेस मादी १०० ते ३०० अंडी देते.  मादी आपल्या आयुष्यात १००० ते ३००० अंडी देते.  अशा हजारो-लाखो माद्या सतत अंडी देत असतात.  कुटुंब नियोजन या विषयांबाबतीत त्यांना रस आणि विश्वास नाही.  आपलाही नाही, विश्वास असता तर आपण ४० कोटीचे १२५ कोटी झालो नसतो.  स्वर्गीय संजय गांधी यानंतर कोणत्याही नेत्याने कुटुंब नियोजनावर भाष्य केल्याचे स्मरणात नाही.  आरक्षण आणि कुटुंब नियोजन यावर सार्वजनिक भाष्य केल्यास त्या नेत्याला लगेच जाती बाहेर काढतात.  बरे असो.  मादी डबक्यात किंव्हा शांत वाहणाऱ्या पाण्यात अंडी देते.  थोड्याच दिवसात प्रौढ आणि परिपक्व झालेला डास पुढील दोन ते तीन आठवडे तुम्हाला त्रास देतो आणि चावतो.  परंतु डासांना लपण्यासाठी योग्य जागा मिळाली तर ते सहा महिने पर्यंत जगू शकतात.  मग तेवढा त्रास तुम्ही सहन करा.  मुलगी सुद्धा वीस ते पंचवीस वर्षाची झाली की लग्न करते नंतर नवऱ्याला जन्मभर छळते.  


     डासांच्या पैदासी साठी पाण्याची नितांत आवश्यकता असते.  अडलेले  पाणी तसेच डबकी, टायर, कुलर, ढोली, ओलिताची जमीन, गटार, नाली, इत्यादी मध्ये साचलेले पाणी किंवा संथ वाहणाऱ्या पाण्यात मादी अंडी देते.  एकूण चार टप्यात अंडी पासून डास तयार होतो.  यासाठी एक ते दोन आठवडे अवधी लागतो.  तेंव्हा पाणी साचणार नाही याकडे सर्वांचे लक्ष हवे.  तसेच फिनैल सारखे डास नाशक द्रव्य साचलेल्या पाण्यात टाकावे.  ही मोहीम केंद् सरकारने राज्याच्या सहकार्याने संपूर्ण देशात सतत राबविली पाहिजे.  यामुळे डासांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होईल आणि डासांची संख्या आटोक्यात राहील.  लग्नानंतर चार वर्ष स्थिरावली की आधुनिक शिकलेली बायको बाळंतपणाचा विचार करते.  एकदा लग्न झाले की कोणताही उपाय योजला तरी ती आई बनते, ‘हम दो हमारा एक’ हे तत्व लक्षात ठेवते.  कोणत्याही औषधाचा परिणाम तिच्यावर होत नाही.    



देवाची मादीवर विशेष कृपा आहे.  मादीं डासांना एक खास शारीरिक अवयव (सोंड) फक्त चावण्यासाठी दिलेला आहे, तो नरांना नसतो.  तुमचे नशीब बलवत्तर की निसर्ग नियमांनुसार डास प्रजातीतील फक्त मादीच तुम्हाला चावते, दोघांनीही चावा घेतला असता तर!  बरे, चावायचे असेल तर चाव बाई, परंतु भुणभुण न करता चाव ना आणि जा.  तिच्यात आणि सौ. मध्ये साम्य असल्यामुळे दोघीही सतत भुणभुण करतात, सळो की पळो करतात.  बायकोला टोचून बोलण्याची कला जन्मजात अवगत असते, नवऱ्याला नाही.  डास मादी तुलनात्मक बरी.  ती चावते आणि जाते व पुन्हा भूक लागली की जवळ येते, पण, सौ. सतत चावते तर चावते परंतु जळू सारखी जन्मभर चिकटलेली असते.  मादी डास एका वेळेस केवळ एक ते दोन थेंब रक्त पिते, रक्तातील घटकांचा (मुख्यत्वे प्रथिनाचा) उपयोग अंडी परिपक्व करण्यासाठी होतो.  या विरुद्ध पत्नी अधाश्यासारखी सतत नवऱ्याचे रक्त पीत असते, यामुळे तिचा आणि तिच्या बाळाचा लाभ होतो.  नर आणि मादी दोघेही डास आपल्या कानाजवळ नाहक घोंघावतात.  एका सेकंदात शेकडोदा पंख हलविल्यामुळे घोन्घावण्याचा आवाज होतो.  मादी त्यातही नरापेक्षा जास्त मोठा आवाज करून आपल्याला हैराण करते.  स्त्रिया ज्यास्तच वाचाळ असतात आणि पुरुषांपेक्षा जास्त जोरदार बोलतात हे वरील सिद्धांतावरून सिद्ध होते.       
 
मादी डासांवरचा राग माणसाला अनावर झाला तर तिचा चक्क खून करता येतो, घटनेच्या वेगवेगळ्या कलमानुसार जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा होत नाही.  रक्तपिपासू सौ. च्या बाबतीतला विचार मनातच घोंघावत असतो.  बिचारा नर डास पान आणि फुलातील अर्कावर आपली भूक भागवतो, पुरुषा सारखाच संपूर्ण समाजाचा गंभीरपणे विचार करून तो कोणालाही चावण्याच्या भानगडीत जीवनात पडत नाही आणि जे मिळेल ते शिळ पाळ खातो.



मादी डासांचे मानसिक शास्त्र समजून घ्या.  मादी डासांना कोणताही त्रास देवू नका, त्यांना पिटाळू नका, त्यांना मारू नका.  एकदा तिला कळले की या घरातील मंडळींपासून तिळमात्र त्रास नाही तर त्या चवताळत नाहीत, त्या सामोपचाराने राहतात.  मादी डास हुशार असते.  भूक लागली तरच ती  चावते, अन्यथा तुम्हाला चावण्यात तिला रस नसतो.  दुसरे असे की, एकदा मादी डासांनी मुक्काम तुमच्या घरात केला तर सहजा सहजी त्या दुसऱ्याच्या घरात प्रवेश करीत नाहीत आणि दुसऱ्या घराच्या माद्यांना तुमच्या घरात प्रवेश देत नाहीत.  हेच मानसिक शास्त्र महिला मंडळला लागू होते.  नवरा शांत स्वभावाचा असला आणि पत्नीच्या कारभारात लक्ष न देणारा असला की संसार सुखाचा होतो, भांडणाचे प्रसंग कमी येतात.  तसेच, कोणतीही स्त्री दुसऱ्या स्त्रीला स्वतःच्या घरात प्रवेश करू देत नाही हे निर्विवाद सत्य आहे.  असे झाल्यास स्त्रियांमध्ये युद्ध होते.  तसेच तिच्या इच्छा पूर्ण केल्यास तुमचे त्रासाचे प्रमाण कमी होते.  ती वेळी प्रसंगी तुमचा पान उतारा करीत असते ते वेगळे.  तेंव्हा स्वतः कोणालाही त्रास देवू नका, डासाला आणि पत्नीला.  रात्री कानाजवळ नर आणि मादी डास हे दोघे ही गुणगुणतात.  रात्री नवरा किंवा बायको किंवा दोघेही जोरात घोरतात ते तुम्हाला जन्मभर चालते आणि डासांनी कानाजवळ घोंघावले तर त्रास होतो, ही संकल्पना चुकीची आहे.



डास हा वास, नजर आणि भक्षाची शारीरिक उष्णता या तिन्हींही गुणांचा यथायोग्य उपयोग करून आपले भक्ष शोधतो.  मानवाच्या उच्छवासामुळे निर्माण होणाऱ्या कार्बन-डाय-ओक्सिड या वायूच्या वासामुळे डास आपल्याला शंभर फुटावरून शोधू शकतो.  सुगंधित अत्तरामुळे डास मानवाकडे आकर्षित होतो.  घाम, आद्रता आणि शरीरातील ठराविक आम्ल यामुळे डास मानवाला शोधतो.  डास तीस फुट अंतरा नंतरचे पाहू शकत नाही, दहा ते तीस फुट या मधील असलेले सावज शोधतांना त्यांच्या नजरेला त्रास होतो.  परंतु, १० फुटाच्या आतील भक्ष अचूक शोधून नंतर हल्ला करतो.  महिलांचे असेच असते.  तिचे पंचेंद्रिय तीक्ष्ण असतात.  माणसाला सहावे इंद्रिय नसते ते तिला असते. सर्व इंद्रियांचा ती यथायोग्य उपयोग करते. यामुळे सर्व बायका अत्यंत चाणाक्ष असतात.  नवऱ्याच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवतात आणि योग्य वेळीच हल्ला करतात, पतीला रक्त बंबाळ करतात आणि स्वतःचा उल्लू साध्य करतात.   



डासांना काळ्या रंगाचे आकर्षण असते.  अंधार तसेच काळेगर्द कपड्यामुळे डास तीस फुटाच्या आतील व्यक्तीला त्रास देतो.  गोरी देखणी मुलगी काळ्या सावळ्या मुलाशी विवाह करण्या मागील कारण तुम्हाला कळले असावे.  डासांना देवाने एक नैसर्गिक देणगी दिली आहे.  त्यांच्या शरीरात औष्णिक संवेदी चेतातन्तु असल्यामुळे डासांना मानवाच्या त्वचेत रक्त वाहिनी कोठे आहे हे कळते, तेथेच डास बसतो आणि आपली सोंड त्वचेतून रक्त वाहिनीत घुसवतो, नंतर रक्ताचे शोषण करतो.  पत्नीसुद्धा पतीचे रक्त कधी प्यायचे, पतीचे कमकुवत आणि दुबळे गुण कोणते आहे, कधी संधी साधायची या गोष्टी तिला जन्मजात कळतात.  आद्रतेनुसार औष्णिक संवेदी चेतातन्तुचा विकास डासांमध्ये कमी जास्त होत असतो.  मादी डास चावल्यामुळे आपल्याला दुखत नाही, किंबहुना ती चावते आहे हे ही कळत नाही.  परंतु, ज्यावेळेस मादी चावते त्या वेळेस तिच्या तोंडातल्या लाळेमुळे खाज सुटणे, भाग लाल होणे, भाग सुजणे इत्यादी त्रास आपल्याला लगेच समजतो.  शहाणी मादी पोट भरल्या बरोबर लगेच उडते.  लाखात एखादी आळशी मादी रक्त जास्त प्याली आणि आता उडू असा विचार करत बसली आणि पेंगली तरच व्यक्ती सतर्क होतो आणि पुढील कार्यवाही करतो.  बायको सुद्धा जन्मजात खूपच हुशार असल्यामुळे ती योग्य वेळी योग्य काळी नवऱ्याला डंख मारते रक्त बंबाळ करते आणि  उद्दिष्ट (जसे साडी लाटणे, सोन्याचे दागिने करणे इत्यादी बाबतची मौखिक परवानगी) साध्य झाल्या बरोबर लगेच पलायन करते.  एखाद्याची पत्नी बिचारी बावळट सारखी राहते.



डासांच्या अंदाजे ३००० प्रजाती आहेत.  बहुतांश प्रजाती सुर्यादय आणि सूर्यास्ताच्या वेळेस फारच जास्त सक्रीय असतात.  कांही प्रजाती २४ तास आक्रमक असतात.  डासांना नाहक चावाण्यापासून परावृत्त करण्यासाठी किंवा ठार मारण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवली जाते.  शरीराला वेगवेगळी क्रीम लावतात, त्यामुळे त्वचारोग आणि कर्करोग होण्याची शक्यता असते, सतत घाणेरडा वास येतो ते वेगळे.  कांही स्वतःला सायना नेहवाल किंवा गोपीचंद समजतात, रेकेट ला सतत गदेसारखी फिरवीत असतात.  कांही चौवीस तास गुडनाईट किंवा तस्यम द्रव्याचा विजेच्या साधनांनी वायूत रुपांतर करतात यामुळे श्वासाचे रोग होतात.  कांही इलेक्ट्रोनिक उपकरण वापरून किरणांमुळे डासांचा नाश करतात, यामुळे कर्क रोग होतो.  कांही मंडळी वेजेचा पंखा वेगाने फिरवितात, विजेचे बिल नाहक वाढते.  यामुळे डास थोड्यावेळ कमी दिसतात नंतर त्यांची संख्या पूर्ववत होते.  सर्व उपाय तातपुरते आहेत.  बायकोचा स्त्री हट्ट पुढे ढकलण्यासाठी नवरा वेगवेगळी उपाय योजतो.  परंतु बायको बधत नाही.  इच्छा पूर्ण होई पर्यंत ती २४ तास मागे लागते.  भाजीत मीठ नसल्यास बायको चक्क टोचून बोलते की “सोनुबाईने अन्न शिजविले आहे, तिच्या हातात सोन्याच्या पाटल्या नाहीत” किंवा “गरिबांनी गरीबा सारखे जेवावे, श्रीमंतासारखे नखरे करू नयेत.  सोन्याच्या पाटल्या विकत घेण्याची ऐपत नाही.”



डासांचा नायनाट करण्यासाठी काही मंडळी तरबेज असतात.  डास दिसला की मार हे त्यांचे तत्व असते.  डास मारल्या शिवाय त्यांना चैन पडत नाही.  प्रत्येक टाळीत हमखास डास मारणारे तरबेज आहेत.  यासाठी अनोळखी माणसाच्या अंगावरचा डास मारायला ते मागे पुढे बघत नाहीत.  आपण दचकतो हे वेगळे.  छताला उलटे लटकलेले डास वही फेकून मारण्यात पटाईत असलेली महिला लेखकाने अनुभवली आहे, प्रत्येक फेकीत डास हमखास मरतोच.  काहींना रात्री उठून डास मारण्यात आनंद मिळतो.  दुसऱ्यांच्या झोपेचे खोबरे झाले तरी ही मंडळी आपले कार्य करीत असतात.  या उद्धोगात सौ. ने पुढाकार घेण्यासाठी तिला प्रोत्साहित करावे.  यामुळे ती डास मारण्याच्या कामात व्यस्त राहील, आपण आराम करावा.

नवीन घर बांधतांना मालक दरवाजे आणि खिडकीला बारीक जाळी लावतात.  जुन्या घरांना मच्छरदानी सारखी कापडी जाळी लावतात.  या दोन्हीमुळे घरात डासांची संख्या रोडावते.  आपला देश उष्ण कटिबंध प्रदेशात मोडत असल्यामुळे या दोन्ही प्रकारात खेळती हवा बाधित होते.  घरात कार्बन-डाय-ओक्सिड या वायूचे प्रमाण वाढते, तेंव्हा मोकळया हवेचा बंदोबस्त करावा.



मुरारी बापूचे रामायणावर प्रवचन चालू असतांना पत्नीने सहज नवऱ्याला विचारले “रामाला चौदा वर्षे वनवास घडला तेंव्हा त्यांना डास चावले नाहीत काय? ते तर अंगवस्त्र कमीत कमी घालायचे.”  पती काय उत्तर देणार.  बरे झाले तिला दिगंबर मुनीच्या प्रवचनाला नेले नव्हते.  कलियुगातील महिलांना अंग प्रदर्शनात विशेष रुची असते त्यांना जास्त संखेने डास चावतात काय, या बद्धलचे संशोधन व्हायला हवे. 

गर्भवती महिलेला इतरांच्या तुलनेत डास जास्त चावतात, प्रौढांना बालकांच्या तुलनेत जास्त डास चावतात, माणसांना महिलांच्या तुलनेत जास्त डास चावतात किंवा उलट इत्यादी विषयांवर संशोधन सुरु आहे.  सकाळ-संध्याकाळ शरीर स्वच्छ ठेवल्यास, पुरेसा प्रकाश असल्यास, खेळती हवा असल्यास, घर स्वच्छ ठेवल्यास, पांढरे स्वच्छ कपडे अंगभर घातल्यास, घरात धूप लावल्यास डास कमी चावतात हे नक्की.  संक्रांतीला बायकोला चक्क काळ्या रंगाचे खूप सारे कपडे खरेदी करून द्यावे.  कधी नव्हे ते पतीने कपडे खरेदी करून दिलेत म्हणून बायको खुश, आणि बायकोला डासांनी जास्तीत जास्त चावावे यासाठी नवरा खुश.  काळे कपडे तुला शोभून दिसतात असे खोटे बोला.  डास चावल्याने कांही रोगांचा प्राधुर्भाव होतो.  मलेरिया, यलो फिवर, हत्ती रोग, डेंगू, इंसीफ्यालायटीस, चिकन गुनिया, झिका या सारखे जीवघेणे रोग मनुष्याला होवू शकतात.  डास चावल्यामुळे लाळेतील कित्येक प्रकारचे जीवाणू आणि विषाणू आपल्या शरीरात जातात.  तेंव्हा डासांपासून जपून रहा.  एड्स सारखी प्राण घातक बिमारी डासांमुळे होत नाही.

डास आणि बायको यांचे पासून कमीत कमी त्रास व्हावा असे वाटत असल्यास दररोज पाहते उठा, सुर्योदया पूर्वी व्यायाम करायला जा, यामुळे सूर्योदयाच्या वेळेस तुम्हाला दोघांचाही त्रास होणार नाही.  त्यानंतर ऑफिसला लवकर जा आणि तीन्हीसंजेनंतर घरी या, यामुळे बॉस खुश, तसेच बायको आणि डासाच्या तावडीतून तीन्हीसंजेला सुटका.  पत्नीला राजेशाही खोली द्या, सर्व सुखसोई द्या.  या शिवाय, बायकोला पूर्ण पगार द्या, तिला घरचा मुख्य बनवा, तिच्या प्रत्येक निर्णयाचे स्वागत करा, स्वतःला काहीही येत नाही असे भासवा, मूर्ख आणि गाढव असल्याचे नाटक करा, राष्ट्रपती सारखे काम न करता रहा आणि संसारातून मुक्त व्हा.  स्वतः दुसऱ्या खोलीत मच्छरदाणीच्या आत निवांत झोपा या सारखे स्वर्गीय सुख नाही.

//////////++++++++++//////////


              

No comments:

Post a Comment

Indian Stand: Champions Trophy

                                                                                    Mohan Kothekar It has been decided by the ...